Ad will apear here
Next
पं. सुरेशबाबू माने, गॅलिलिओ गॅलिली
किराणा घराण्याचे गायक सुरेशबाबू माने आणि प्रसिद्ध फारसी आणि उर्दू कवी गालिब यांचा १५ फेब्रुवारी हा स्मृतिदिन. तसेच, खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली यांचा १५ फेब्रुवारी हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
.........
पं. सुरेशबाबू माने
१९०२ साली पं. सुरेशबाबू माने यांचा जन्म झाला. पंडित सुरेशबाबू माने ऊर्फ अब्दुल रहमान यांचा जन्म किराणा घराण्याचे उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेब व ताराबाई माने या दाम्पत्याच्या पोटी झाला. ताराबाई ह्या सरदार मारुतीराव माने यांच्या सुकन्या होत. मारुतीराव माने हे बडोदा संस्थानाच्या राजमातांचे बंधू होते. अब्दुल करीम खाँ हे त्या राजदरबारात गायक होते व ताराबाईंना गाणे शिकवत होते. दोघांचे प्रेम जुळले व त्यांनी विवाहाचा निर्णय घेतला. परंतु ताराबाईंच्या मातापित्यांचा ह्या विवाहास विरोध असल्यामुळे अब्दुल करीम खाँ व ताराबाईंना संस्थान सोडावे लागले. त्यांनी मुंबईत संसार थाटला व यथावकाश पाच अपत्यांना जन्म दिला. त्यांच्या दोन पुत्रांची नावे सुरेश उर्फ अब्दुल रहमान व कृष्ण ही होती; तर मुलींची नावे चंपाकली, गुलाब आणि सकीना उर्फ छोटूताई अशी होती. पुढे ही भावंडे अनुक्रमे सुरेशबाबू माने, कृष्णराव माने, हिराबाई बडोदेकर, कमलाबाई बडोदेकर आणि सरस्वतीबाई राणे या नावांनी प्रसिद्धीस पावली. 

सुरेशबाबूंना संगीताचे प्रारंभिक शिक्षण आपल्या वडिलांकडून मिळाले आणि नंतरचे शिक्षण त्यांनी वडिलांचे मेव्हणे व किराणा घराण्याचे ज्येष्ठ संगीतकर्मी उस्ताद अब्दुल वाहिद खान यांच्याकडून व सवाई गंधर्वांकडून प्राप्त केले. सुरेशबाबूंच्या गाण्यात उत्स्फूर्तता, माधुर्य व सौंदर्य होते. त्यांची लय व तालावरची पकडही उत्तम होती. ख्याल, ठुमरी, दादरा, मराठी नाट्य संगीत आणि भजन या गायन प्रकारांवर सुरेशबाबूंचे प्रभुत्व होते. त्यांनी अनेक मराठी नाटकांत व चित्रपटांत वेगवेगळ्या भूमिका केल्या. अमृतमंथन, रजपूत रमणी आणि चित्रसेना हे त्यांचे चित्रपट. त्यांनी संन्यास-कल्लोळ नाटकात अश्विनशेठची आणि सुभद्रा नाटकात अर्जुनाची भूमिका केली होती. सावित्री, सच है आणि देवयानी या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन सुरेशबाबूंचे होते. 

मूक चित्रपटांच्या कारकिर्दीत सुरेशबाबू पडद्यामागे बसून हार्मोनियम किंवा तबला वाजवीत. त्यांच्या शिष्य परिवारात प्रमुखतः हिराबाई बडोदेकर व प्रभा अत्रे ह्या प्रख्यात गायिकांचा समावेश होतो. तसेच वसंतराव देशपांडे, पं. भीमसेन जोशी, माणिक वर्मा यांनाही सुरेशबाबूंचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या शिष्या डॉ. प्रभा अत्रे यांनी मुंबईत, सुरेशबाबूंच्या नावाने ‘सुरेशबाबू -हिराबाई स्मृती समारोह’ या वार्षिक संगीत महोत्सवाच्या आयोजनाला १९९२ साली प्रारंभ केला. आता हा संगीत महोत्सव भारतातील नावाजल्या जाणाऱ्या प्रमुख संगीत महोत्सवांपैकी एक गणला जातो. याला मुंबईचा सवाई गंधर्व असे समजले जाते. ‘जोशेर का बच्चा है, वो शेर जैसाही बहादूर होगा,’ असे उद्गार उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेब यांनी आपले चिरंजीव सुरेशबाबू माने यांच्याबद्दल काढले होते. सुरेशबाबू माने यांचे निधन १५ फेब्रुवारी १९५३ रोजी झाले. 
.........


गॅलिलिओ गॅलिली
१५ फेब्रुवारी १५६४ रोजी गॅलिलिओंचा जन्म झाला. गॅलिलिओ यांनी दुर्बिणीतून असंख्य गोष्टी अभ्यासल्या. शुक्राच्या कला पाहिल्या. गुरू आणि गुरूभोवती फिरणारे चार चंद्र पाहिले. खरे तर गॅलिलिओला नेपच्यूनच्या शोधाचा मानही मिळाला असता. गुरूजवळ तेव्हा नेपच्यून होता. पण सूर्यमालिकेत असे काही अज्ञात ग्रह असतील असा विचारही तेव्हा शिवला नव्हता. इतकेच कशाला, पृथ्वी सूर्याभोवती फिरते यावरच कोणाचा विश्वास नव्हता. त्यामुळे सूर्याभोवती फिरणारा ग्रह अस्तित्वात असण्याचा प्रश्नच नव्हता. आपल्या या निरीक्षणांवर आधारित ‘स्टारी मेसेंजर’ नावाचे पुस्तक १६१० मध्ये गॅलिलिओ यांनी प्रसिद्ध केले. शुक्राला कला कशा काय असतात? गुरूभोवती छोटे गोल फिरू शकतात? मग सूर्याभोवती पृथ्वी आणि इतर ग्रह का फिरू शकणार नाहीत? असे प्रश्न त्यामध्ये उपस्थित केले होते. 

कोपर्निकसने मांडलेल्या सूर्यकेंद्री सिद्धांतात तथ्य असले पाहिजे, असे गॅलिलिओ यांना वाटू लागले. १६१५ च्या दरम्यान त्यांनी या सिद्धांताला उघडपणे पाठिंबा द्यायला सुरुवात केली आणि इथेच समाज आणि व्यक्ती हा संघर्ष सुरू झाला. समाजाची वैचारिक धारणा प्रस्थापितावर विश्वास ठेवणारी असते. नव्या कल्पना, नवे विचार जर प्रस्थापितांविरुद्ध असतील तर ते समाजाला मुळीच खपत नाही. शास्त्रीयच नव्हे तर शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातही हे घडते. नव्या विचारांना हाणून पाडण्यासाठी मग धर्म आणि धर्मग्रंथांचा आधार घेतला जातो. या गोष्टी धर्ममार्तंडांना सोयीच्या असतात. कारण याआधारे सामान्य जनतेला नवविचारांपासून दूर ठेवता येते. कॅथॉलिक चर्चने गॅलिलिओला पाखंडी ठरवले आणि त्याने सूर्यकेंद्री सिद्धांताचा प्रचार करू नये असे फर्मान काढले. 

१६२४नंतर आलेला पोप आपल्या विचारांना अनुकूल आहे असे वाटल्यावरून गॅलिलिओने पुन्हा एक पुस्तक लिहिले. पण पुस्तकाचा कल सूर्यकेंद्री रचनेकडे झुकतो आहे असे वाटल्यावरून पुन्हा एकदा त्याच्या पुस्तकावर बंदी आणली गेली. ६९ वर्षांच्या गॅलिलिओ यांना दम देण्यात आला. पाखंडी मताचे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले. त्यांना तुरुंगात डांबण्यात आले आणि तेसुद्धा मरेपर्यंत. पृथ्वी सूर्याभोवती फिरत नाही हे त्याच्याकडून बळजबरीने वदवून घेण्यात आले. 

गॅलिलिओ यांच्या वरचे आरोप ३१ ऑक्टोबर १९९२ या दिवशी चर्चने अधिकृतपणे मागे घेतले. वास्तववादी विचार मान्य करण्याची घोषणा करण्यास ३५० वर्षांपेक्षा जास्त काळ लागला आणि तेही गॅलिलिओच्या त्यागानंतर. केवळ विचाराने आणि तर्काने या विश्वाचे नियम उलगडून दाखवता येतात या अॅरिस्टॉटल यांच्या मतांना धक्का देणारा आणि या तत्त्वज्ञानाला विरोध करणारा माणूस म्हणून गॅलिलिओ यांनी केलेले कार्य फार महत्त्वाचे आहे. प्रयोग आणि निरीक्षण याचे महत्त्व गॅलिलिओ यांनी सिद्ध केले. केवळ विरोधासाठी विरोध केला नाही. जड वस्तू आणि हलकी वस्तू एकाच उंचीवरून खाली सोडल्या तर कोणती वस्तू अगोदर खाली पडेल? जड वस्तू खाली पडेल हे आपल्याला विचाराने सुचणारे परंतु धादांत चुकीचे उत्तर असते. पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाने वस्तू खाली खेचल्या जातात. त्यांचा वेग वाढत जातो, पण वेगातील ही वाढ त्या वस्तूंच्या आकारावर किंवा वस्तुमानावर अवलंबून नसते हे सिद्ध करायला फार मोठा आटापिटा करावा लागत नाही. साध्या प्रयोगाने गॅलिलिओ यांनी हे सिद्ध केले. 

आपल्याला सत्य वाटणाऱ्या गोष्टींची सत्यता प्रयोगाने पडताळून पाहण्याची मानसिकता निर्माण करणे हे गॅलिलिओचे मोठे योगदान आहे. वयाच्या १९ व्या वर्षी गॅलिलिओ यांनी लंबकासंबंधीचा गैरसमज दूर करून खरा नियम जगासमोर आणला. त्याचा आंदोलनकाळ त्याने नाडीच्या ठोक्याच्या साहाय्याने मोजला आणि लंबकाचा आंदोलनकाळ त्याच्या आयामावर अवलंबून नसून लांबीवर अवलंबून आहे हे प्रयोगाने सिद्ध केले. गॅलिलिओ हे चांगले साहित्यिकही होते. गद्य साहित्याबरोबर त्यांच्या कविताही प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यांनी कवितांसाठी दाँते अॅबलेहोरीची अकरा शब्दांची एक ओळ ही शैली वापरली होती. ‘डिव्हाइन कॉमेडी’ या सुप्रसिद्ध महाकाव्यात दाँतेनी ही शैली योजिली आहे. गॅलिलिओंनी अनेक सुनीतं रचली. गॅलिलिओ यांचं सर्व वैज्ञानिक लेखन अनुवादित स्वरूपात इंग्रजीत उपलब्ध आहे. मात्र त्यांचं साहित्यिक लेखन- विशेषत: काव्य विसावं शतक संपेपर्यंत तरी इंग्रजीत उपलब्ध नव्हतं. गमतीची गोष्ट म्हणजे गॅलिलिओंचं अगदी पोपनी बंदी घातलेलं सगळं वैज्ञानिक लेखन सतरावं शतक संपण्यापूर्वीच अनुवादरूपानं इंग्रजीत उपलब्ध झालं होतं. पण त्यांच्या कवितांचे अनुवाद इंग्रजीत प्रसिद्ध व्हायला एकविसावं शतक उजाडावं लागलं. जून २००० मध्ये गिओव्हानी पी. बिग्नामी यांनी गॅलिलिओंच्या काव्याचा केलेला इंग्रजी अनुवाद ‘अगेन्स्ट टू डॉनिंग ऑफ द गाऊन’ या शीर्षकानं इंग्रजीत प्रसिद्ध झाला. गॅलिलिओ यांचे आठ जानेवारी १६४२ रोजी निधन झाले.
.....


गालिब
२७ डिसेंबर १७९७ रोजी गालिब यांचा जन्म झाला. मिर्ज़ा असद-उल्लाह बेग ख़ां उर्फ ‘ग़ालिब’ हे एक प्रसिद्ध फारसी आणि उर्दू कवी होते. ते सुधारक वृत्तीचे, सर्व धर्मांना समान मानणारे, कर्मठ नसलेले, नमाज न पढणारे, रोजा न ठेवणारे, कलेचे आसक्त, रसिक व्यक्ती होते. गालिब केवळ चार वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले म्हणून आजोबा आणि काकांनी पालनपोषण केले. लहानपणी त्यांनी इस्लामचे धडे घेतले, फारसी भाषा शिकले. मिर्झा गालिब हे थोरल्या बाजीरावांची पत्नी मस्तानी हिच्या वंशात जन्माला आले होते. गालिब यांनी फारसी भाषेत लिखाण काम सुरू केले. त्यांच्या साहित्यात जीवनाचे गंभीर तत्त्वज्ञान त्यांनी मांडले. 

वयाच्या ११व्या वर्षापासून गालिब शेर लिहीत होते. जीवनाच्या झळा सोसून मिर्झा गालिब यांनी त्या सुंदर करून काव्यातून मांडल्या. त्यांनी एकूण १८ हजारांहून अधिक शेर फारसी भाषेत रचले. पुढे मित्रांच्या आग्रहाखातर त्यातीलच १०००-१२०० शेर त्यांनी उर्दू भाषेत लिहिले. गालिब यांनी कधी कोणताही उद्योग-धंदा केला नाही. मित्रांच्या आणि नातेवाईकांच्या सहकार्याने ते राहत. त्यांना स्वतःला प्रसिद्धी मिळविण्याची गरज वाटली नाही. उत्तर मुघल काळातील राजांच्या, उमरावांच्या दरबारी जाणेही त्यांना आवडत नसे. 

ते म्हणत, ‘माझ्या कविता माझ्या मृत्यूनंतरही अजरामर राहणार असल्याने माझे नाव आपोआपच सर्वत्र पसरणार.’ गालिबच्या काव्यावर मीर आणि आमीर खुसरो यांच्या रचनांचा प्रभाव होता. साहित्य निर्मिती करताना केवळ चौकट मोडून चालत नाही. त्यात तितकी ताकदही असावी लागते. गालिबने परंपरेला नावीन्याची झालर लावली. अभिजात सौंदर्याची बूज राखायला शिकवले. घराण्यातच सैनिकी पार्श्वभूमी असल्याने गालिबमध्ये बंडखोरीचे बीज होते. 

मिर्झा गालिब यांच्यावर हिंदीत १९५४ साली एक चित्रपट निघाला होता व दुसरा १९८८ साली दूरचित्रवाणीसाठी बनला होता. पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शक सोहराब मोदी तर दुसऱ्या चित्रपटाचे दिग्दर्शक गुलझार होते. मिर्झा गालिब यांचे निधन १५ फेब्रुवारी १८६९ रोजी झाले. 
............
माहिती संकलन : संजीव वेलणकर
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IUPICV
Similar Posts
मिर्झा गालिब, पं. सुरेशबाबू माने, गॅलिलिओ गॅलिली प्रसिद्ध फारसी आणि उर्दू कवी गालिब आणि किराणा घराण्याचे गायक सुरेशबाबू माने यांचा १५ फेब्रुवारी हा स्मृतिदिन. तसेच, खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली यांचा १५ फेब्रुवारी हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
अब्दुल हलीम जाफर खान, पं. उल्हास बापट, सर आयझॅक पिटमॅन ज्येष्ठ सतारवादक अब्दुल हलीम जाफर खान, ख्यातनाम संतूरवादक पं. उल्हास बापट आणि लघुलिपीचे (शॉर्टहँड) जनक सर आयझॅक पिटमॅन यांचा चार जानेवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने त्यांचा हा अल्प परिचय...
रामदास पाध्ये, हंसा वाडकर, सुभाष घई, जे. ओमप्रकाश बोलक्या बाहुल्यांचे खेळ प्रसिद्ध करणारे शब्दभ्रमकार रामदास पाध्ये, मराठी अभिनेत्री-नृत्यांगना रतन साळगावकर ऊर्फ हंसा वाडकर, राज कपूरनंतर ‘शोमॅन’ या पदावर आरूढ झालेले एकमेव निर्माते-दिग्दर्शक सुभाष घई, प्रख्यात दिग्दर्शक, निर्माते जे. ओमप्रकाश यांचा २४ जानेवारी हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय
डॉ. सतीश धवन, अरविंद देशपांडे, जॉय अॅडम्सन नामवंत अंतराळशास्त्रज्ञ डॉ. सतीश धवन, ख्यातनाम अभिनेते अरविंद देशपांडे आणि वन्यजीवनाबद्दल लेखन करणाऱ्या लेखिका जॉय अॅडम्सन यांचा तीन जानेवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने त्यांचा हा अल्प परिचय...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language